यशोगाथा

  • Print

दहा वर्षाची गौरवशाली वाटचाल...
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाला स्थापनेच्या वेळी १३ कर्मचारी मंजूर करण्यात आले व जिल्हास्तरावरील कामकाज महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळामार्फत चालविण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट, २००५ मध्ये जिल्हास्तरावरील कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या महामंडळाकडे सोपवण्यात आले. आजतागायत ही व्यवस्था कायम आहे. मुख्यालयात केवळ १३ कर्मचारी व जिल्हा स्तरावर स्वतःची यंत्रणा नाही अशा विपरीत परिस्थितीत कामाला सुरुवात करूनही गेल्या १० वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्र राज्य वित्त व विकास महामंडळाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

महामंडळाचे पहिले व्यावासाथापाकीय संचालक श्री. वसंत संखे हे मंत्रालयात वित्त विभागात उपसचिव पदावर कार्यरत होते व ते स्वतः दोन्ही पायांनी पोलिओग्रस्त होते, अशाप्रकारे स्वतः पराकोटीचे दिव्यांगत्व असलेली, मंत्रालयात प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेली व दिव्यांगांच्या चळवळीमध्ये सक्रीय असलेली व्यक्ती व्यवस्थापकीय संचालक म्हणून लाभल्यामुळे या महामंडळाची सुरुवात दमदार झाली. दिनांक २७ मार्च २००२ रोजी तुटपुंज्या कर्मचारी वर्गासह कामकाजाला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच वर्षी महामंडळाने तब्बल १४१३ दिव्यांगांना ९.१२ कोटींचे कर्ज वितरित केले. शिबिरे, मेळावे या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत योजनांची माहिती पोहोचवली व कर्ज वितरित करण्यात आले. या कार्यात दिव्यांगांच्या स्वयंसेवी संस्था व संघटनांचे मोलाचे योगदान राहिले म्हणून गेल्या १० वर्षात महामंडळाने जवळजवळ १० हजार दिव्यांग बांधवांना ४५ कोटीचे कर्ज वितरित करून संपूर्ण देशात उच्चांक गाठला.

सर्वोत्कृष्ट प्राधिकृत वाहिनी पुरस्कार
सन २००६ मध्ये देशात सर्वाधिक कर्जवितरण केल्याबद्दल या महामंडळाला तत्कालीन महामहीम राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे शुभहस्ते सर्वोत्कृष्ट प्राधिकृत वाहिनी हा राष्ट्रीय पुरस्कार महामंडळाला प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार
सन २००७ मध्ये तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, मा.ना. श्रीमती मीराकुमार यांच्या शुभहस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार महामंडळाला प्रदान करण्यात आला.

दिव्यांगांचे सर्वोत्कृष्ट नियोक्त्तक
सन २००९ मध्ये दिव्यांग दिनाच्या दिवशी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना. श्री. शिवाजीराव मोघे यांच्या शुभहस्ते हा राज्यपुरस्कार महामंडळाला प्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट दिव्यांग अधिकारी
सन २०१० मध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना. श्री. शिवाजीराव मोघे यांच्या शुभहस्ते हा राज्यपुरस्कार महामंडळाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक, श्री. सुहास काळे यांना प्रदान करण्यात आला.

अशाप्रकारे केवळ १० वर्षाच्या अल्पश्या कालखंडात ४ राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळणारे हे एकमेव महामंडळ असावे. आजही कर्जवितरण व कर्जवसुली या दोन्ही आघाड्यांवर महामंडळाने संपूर्ण देशात आपला प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे.