दिव्यांगांच्या विकासाकरिता ५० कोटींचा निधी खेचून आणणार : सुहास काळे

तरुण भारत
८ जून २०१२

अंजनगाव सुर्जी, ७ जून तालुक्यातील मुरहादेवी येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अमरावती, स्टेट बँक ऑफ इंडिया, अंजनगाव सुर्जी व स्वयंसेवी संस्था, तालुका अंजनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग महामेळावा १ जून रोजी माऊली आश्रम मुरहादेवी येथे पार पडला.

मेळाव्याचे उद्घाटन आमदार अभिजित अडसूळ यांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले. अध्यक्षस्थानी साहेबराव पखान होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे, कवी डॉ. विठ्ठल वाघ, उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते, तहसीलदार शरयू आडे उपस्थित होते. सुहास काळे यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना समाजातील दुर्बल, दुर्लक्षित दिव्यांगांच्या जीवनातील अंधःकार दूर सारून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे महामंडळ कटिबद्ध आहे, असे सांगितले. आजपर्यंत महामंडळाकडे अपुरा निधी

असल्यामुळे दिव्यांगांचा विकास कमी गतीने झाला. मात्र, आता महामंडळाला मुबलक निधी मिळत असून, राष्ट्रीय दिव्यांग विकास महामंडळाकडून ५० कोटींचा निधी आपण दिव्यांगांच्या विकासाकरिता आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. डॉ. विठ्ठल वाघ यांनी दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी आत्मविश्वास जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. तहसीलदार शरयू आडे यांनी दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळण्याकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

मेळाव्यात एकूण ५१० दिव्यांगांची नोंदणी झाली, तर १७६ कर्जाच्या अर्जाची विक्री झाली. १२ कर्ज प्रकरणांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ मंजुरीपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग व नागरिक उपस्थित होते. अंजनगाव तालुका महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी तसेच विविध संस्थांतर्फे मदत केंद्र उभारण्यात आले होते. महसूल विभागातर्फे प्रतिज्ञालेख तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जागेवर उपलब्ध करुन देण्यात आले. एसटी महामंडळ व रेल्वे विभागातर्फे प्रवास भाडे सवलत पासेस वितरीत करण्यात आली. रोटरी क्लब अंजनगावतर्फे उपवर दिव्यांग युवक-युवतींची नोंदणी करण्यात आली. मेळावा समितीच्या वतीने उपस्थित लोकांकरिता भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी विनोद अढाऊ, संचालन एस. टी. इंगळे व आभार प्रदर्शन केशवराव कळमकर यांनी केले.