दिव्यांगांसाठीच्या कर्जपुरवठा मर्यादेत वाढ - शिवाजीराव मोघे

  • Print
दिव्य मराठी
११ नोव्हेंबर २०१२
वर्धा

समाजात दुर्लक्षित असलेल्या दिव्यांगांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहता यावे तसेच त्यांना स्वाभिमानाने जीवन जगता यावे यासाठी दिव्यांग व्यक्तींना शासन 25 हजारापर्यंत कर्ज वाटप करीत होते. या कर्जाची मर्यादा वाढवून ती दीड लाखापर्यंत करण्यात आली असून यामध्ये 30 टक्के अनुदानाचा समावेश असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मुंबई व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांना धनादेश व साहित्य वाटप कार्यक्रमात श्री. मोघे बोलत होते. तसेच सामाजिक न्याय भवनात व रुग्णालयात जिल्हा दिव्यांग पूनर्वसन केंद्राचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी संजय भागवत तर प्रमुख उपस्थितीत नगर पालिकेचे अध्यक्ष आकाश शेंडे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी जया राऊत, ओबीसी महामंडळाचे व्यवस्थापक अतुल बोकीन पल्लीवार,आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे अभूदय मेघे, अधिष्ठाता संदिप श्रीवास्तव, डॉ.एस.एस.पटेल,डॉ. आर.सी.गोयल,दिव्यांग केंद्राचे समन्वयक डॉ. सक्सेना, यवतमाळ जिल्हा परिषदचे सदस्य देवानंद पवार आदी उपस्थित होते.

समाजातून दूर्बल व दूर्लक्षित असलेला घटक म्हणून दिव्यांग व्यक्तीकडे पाहिले जात असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री श्री. मोघे म्हणाले, या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्यात येत असते. त्यांच्या कर्ज पुरवठ्यासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती 1 लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच कर्ज पुरवठ्यामध्ये भरघोस वाढ करण्यात आली असून दिव्यांग व्यक्तींना आता स्वतःच्या पायावर सहज उभे राहता येईल अशी सोय शासनाने करुन दिली आहे. दिव्यांग व्यक्तींना दुस-यावर निर्भर राहू नये यासाठी त्यांना ट्रायासिकल व्हिलचेअर्स,कॅलीपर्स,जयपूर फुट व श्रवणयंत्रही देण्यात येणार आहेत.दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.

श्री. भागवत म्हणाले, दिव्यांगांचे जीवन हे परावलंबी आहे.त्यांना स्वावलंबन बनविण्यासाठी शासनाच्या योजनाची जोड दिल्यास ते निश्चितच आत्मनिर्भर होतील. दिव्यांग पूनर्वसन केंद्राच्या माध्यमातून हे सर्व कार्य होणार असल्यामुळे दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात 12 लाख लोकसंख्या आहे.यात अंदाजे दोन टक्के दिव्यांगव्यक्ती गृहीत धरल्यास जवळपास 24 हजार दिव्यांग व्यक्ती आढळून येऊ शकतात. यासाठी वर्षाला 3 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सोबतच आयटीआयमध्ये सुरु असलेली जिल्हा कौशल्य उपक्रमाच्या अल्पकालीन कोर्सेसमध्ये स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिल्यास दिव्यांगांना आपल्या पायावर उभे राहता येईल. त्यासाठी प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठविण्यात येईल.त्या प्रस्तावाला मंजूरी दिल्यास अंपंग व्यक्तीच्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल. मुंबई येथे दोन रुग्णालयातून शिक्षण दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते ही सोय वर्धेत झाल्यास विदर्भातील अनेक दिव्यांगांना त्याचा लाभ मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

श्री. काळे म्हणाले, राज्यात 9 जिल्ह्यामध्ये दिव्यांग पुनर्वसन केंद्र उघडण्यात येणार आहेत. त्यात पहिले केंद्र हे वर्धेमध्ये उघडण्यात आले असून यासाठी आचार्य विनोबाभावे रुग्णालयांनी तयारी दर्शविली होती. तसेच सामाजिक न्याय भवनात दिव्यांग पुनर्वसन कार्यालय उघडण्यात आले आहे. हे कार्यालय वित्त विभागाचा कार्यभार सांभाळणार असून दिव्यांग विकासाचे कार्य रुग्णालय पाहणार आहे. रुग्णालयातून दिव्यांगाची संपूर्ण तपासणी व साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. दिव्यांग सवंर्गाच्या विकासासाठी शासनाने दिव्यांगाचे आरक्षण भरण्याचे कार्य सुरु केले आहे,दिव्यांगाचे धोरण व कृती आराखड्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. दिव्यांगाच्या भागभांडवलात 25 कोटीची तरतूद करण्यात आली होती त्यात वाढ करुण ती 150 कोटी करण्यात आली आहे, दिव्यांग क्षेत्रामध्ये सेवाभावी वृत्तीने कार्य करणा-या व्यक्तींना नियमितपणे पुरस्कार देण्यात येत आहे. अशा अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न असून त्यासाठी शासनाचे सहकार्य व सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अभूदय मेघे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी 17 दिव्यांग लाभार्थ्यांना 17 तिढ सायकलीचे 12 दिव्यांग लाभार्थ्यांना व्हिलचेअरचे 3 दिव्यांग लाभार्थ्यांना कॅलीपर्सचे 10 दिव्यांग लाभार्थ्यांना जयपूर फुटचे दोन दिव्यांग लाभार्थ्यांना श्रवण यंत्राचे वितरण तसेच चार दिव्यांग लाभार्थ्यांना 3 लक्ष 50 हजाराचे धनादेश व 5 दिव्यांग लाभार्थ्यांना 7 लक्ष 50 हजाराचे कर्ज मंजुरीचे आदेश मान्यवराचे हस्ते देण्यात आले.

तत्पूर्वी मंत्रीमहोदयांनी सामाजिक न्याय भवनातील व आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन केले तसेच रुग्णालयात जाऊन दिव्यांग व्यक्तींची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे संचालन संजय इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन अतूल कोतपल्लीवार यांनी मानले.