मतिमंदांचा 'आवाज' मनापासून ऐका

सकाळ
११ मार्च २०१३
पुणे , भारत.

"मतिमंद आणि बहुविकलांगांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांचा "आवाज' समाजाने मनापासून ऐकण्याची आवश्‍यकता आहे. त्यांना न्याय मिळावा, त्यांचे हक्क त्यांना मिळावेत, यासाठी प्रशासकीय पातळीवरही योग्य प्रयत्न व्हायला हवेत," अशी अपेक्षा दिल्लीतील दिव्यांग कल्याण विभागाचे मुख्य आयुक्त प्रसन्नकुमार पिंचा यांनी रविवारी येथे व्यक्त केली. स्वत: अंध असल्याने कोणत्या समस्या आपल्यासमोर येतात, याची मला जाणीव आहे, असेही ते म्हणाले.

प्रौढ मतिमंदांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि "सावली'च्या वतीने आयोजित कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी पिंचा यांनी रसिकांशी संवाद साधला आणि ब्रेल लिपीत लिहिलेले अनेक मुद्देही वाचून दाखविले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते निरंजन पंड्या, "दिव्यांग कल्याण'चे आयुक्त बाजीराव जाधव, "एनएचएफडीसी'चे व्यवस्थापक ए. के. डे, समाजकल्याण विभागाचे आयुक्त आर. के. गायकवाड, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे, "सावली'चे अध्यक्ष वसंत ठकार उपस्थित होते.

मतिमंदांचा 'आवाज' मनापासून ऐका

बहुविकलांग व्यक्तींना मदत मिळत नाही, उपकरणे मिळत नाहीत, कर्ज वेळेवर काढता येत नाही, यांसह त्यांच्या इतर अनेक समस्या आहेत. त्या जाणून घ्यायला हव्यात. त्यासाठी आपणाला त्यांच्यातलेच एक व्हायला हवे. त्यांच्या समस्या एका व्यासपीठावर आणून त्या प्रश्‍नांवर गांभीर्याने चर्चा करायला हवी, असे सांगून पिंचा म्हणाले, ""बहुविकलांग व्यक्तींना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे येतात. मनोभावे कामही करतात. पण, काही संस्था स्वत: मोठे कसे होऊ, याचाच विचार करतात. ही प्रवृत्ती कमी व्हायला हवी."

पंड्या म्हणाले, ""खेडोपाड्यातील बहुविकलांग व्यक्तींपर्यंत सरकारच्या योजना, आरोग्य सुविधा पोचायला हव्यात. याची सध्या कमतरता जाणवत आहे." जाधव म्हणाले, ""दिव्यांगांसाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक जागा रिक्त राहत आहेत म्हणून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत." विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.