महामंडळच्या वसूलीमध्ये वाढ होण्यासाठी लाभार्थी मेळाव्यांचे आयोजन



मेळाव्याचे फोटो पाहण्यासाठी जिल्हयावर क्लिक करा

दिव्यांगांचे साहित्य व कला संमेलन, कल्याण - २०१४

Apang Sahitya Sammelan 2014

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मुंबई व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ, मुंबई यांचे सहयोगाने दिव्यांगाचे दुसरे राज्यस्तरीय साहित्य व कला संमेलन दिनांक २१ व २२ ऑगस्ट, २०१४ रोजी आचार्य प्र. के. अत्रे रंगमंदिर, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) येथे ख्यातनाम विभुतींचे उपस्थितीत संपन्न झाले या साहित्य व कला संमेलना निमित्त भरारी – २०१४ ही स्मरणीका प्रकाशित करण्यात आली असून दिव्यांग साहित्यिकांकडून लेख, कथा, कविता प्रकाशित करण्यासाठी मागविण्यात आले. या संमेलनात ग्रंथ दिंडी, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, परिचर्चा, गीत गायन, संगीत रजनी, नृत्य अविष्कार, वादय-वादन, लघुमाहितीपट, दिव्यांगांचे जीवनातील अनुभव कथन, दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तुंची प्रदशनी, विनोदी नाटक छटा, कॉमेडी शो, यशस्वी दिव्यांग व्यवसायीकांचा व उल्लेखनिय कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या सत्कार, यशस्वी दिव्यांग व्यक्तींची मुलाखत तसेच व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगता यावे याकरीता तज्ञां कडून मार्गदर्शन इ. बाबींचा समावेश करण्यात आला. मा. ना. श्री संजय सावकारे, राज्य मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मा. श्रीमती कल्याणी पाटील महापौर, कल्याण-डोंबिवली महानगर पालिका, उप महापौर मा. श्री राहुल दामले, मा. श्री रामनाथ सोनावणे, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगर पालिका, मा. श्री सुहास काळे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांनी या संमेलनाचे आयोजन केले. या संमेलनात येणाऱ्या सर्व दिव्यांग व्यक्तींची व दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यकांची निशुल्क निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली होती. बहुसंख्य दिव्यांग बांधव या संमेलनात सहभागी झाले होते.

जिद्दीच्या कुंचल्याने आयुष्याचे 'चित्र'

महाराष्ट्र टाईम्स
२६ डिसेंबर २०११

अपघातात एक पाय गमावलेला, भावंडांमध्ये सगळ्यात मोठी असल्याने हिंमत न हारता पुन्हा 'पायांवर' उभे राहण्याचे आव्हान, पण सतत धावत राहणाऱ्या या शहराच्या गतीशी एका पायाच्या जोरावर कसे जुळवून घ्यायचे हा यक्षप्रश्न तिने सोडवला तो कलेचा हात धरून. विरंगुळा म्हणून चित्रकला शिकलेल्या विरारच्या प्रज्ञा पाटीलने या कलेच्या आधारे राष्ट्रीय पातळीवरही कलेची चुणूक दाखवली असून 'दिव्यांग झाले तरी परावलंबी होणार नाही', हे स्वत:ला दिलेले वचन पाळले आहे.

सन १९९९, डिसेंबरचा महिना होता, घरात प्रज्ञाच्या लग्नाची गडबड सुरू होती. त्याचनिमित्ताने ती आपल्या कुटुंबियांसमवेत डहाणूला गेली असता विरार स्टेशनवर गर्दीचा धक्का लागून ती ट्रॅकमध्ये पडली. चालत्या ट्रेनखाली आल्याचे पाहून प्रज्ञाच्या आईवडिलांची शुुद्धच हरपली. ते शुद्धीवर आले तेव्हा ते अॅम्ब्युलन्समध्ये होते आणि समोर होती एक पाय गमावलेली प्रज्ञा. गुडघ्यापासून किंचित वर प्रज्ञाचा पाय कापण्यात आला. पुढले संपूर्ण आयुष्य एका पायावर जगावे लागणार हे निश्चित झाले.

वडील रुपारेल कॉलेजमध्ये कामाला असल्याने कॅम्पसमध्ये खेळणारी मुले आणि मित्रांंसोबत थट्टा मस्करी करणाऱ्यांचा ग्रुप पाहून ती अस्वस्थ होत होती. परंतु, वास्तवाशी जुळवून घेण्यासाठी तिने चित्रकलेचा क्लास लावला. हळूहळू यात गती आल्यानंतर तिने चित्रकलेत प्रयोग करण्यास सुरूवात केली. साध्या कागदावर चित्रे काढण्याबरोबरच काच, लाकूड, भांडी यावर चित्रकला करण्यास तिने सुरूवात केली. बघता बघता वारली, राजस्थानी असे चित्रकलेचे ३० प्रकार ती हाताळू लागली. हे सर्व सुरू असतानाच तिला राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळचे पाठबळ मिळाले आणि सुरू झाला एक नवा अध्याय !

ऑगस्ट २०११ मध्ये दिल्लीत झालेल्या दिव्यांगांच्या वस्तू प्रदर्शनात कलाकृती मांडण्याची संधी प्रज्ञाला मिळाली. या प्रदर्शनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व तीने केले. तिथे मिळालेला प्रतिसाद विचारात घेता जानेवारी २०१२ला वरळी येथील नेहरू सेंटर येथे होणाऱ्या दिव्यांगांच्या प्रदर्शनातही तिला संधी मिळाली आहे. 'अपघात झाल्यानंतर माझे कुटुंबीय घाबरून गेले. 'आता हिचे कसे होणार' या चिंतेने त्यांना ग्रासले होते. परंतु, त्याचे उत्तर माझ्याकडेच होते. दिव्यांग म्हणून लोकांची सहानभूती मिळवण्यापेक्षा कलेच्या मदतीने दोन घास मिळवणे मी पसंत केले. त्यात अनंत अडचणी आल्या अजूनही येतात पण न डगमगता पुढे जात राहिले पाहिजे प्रज्ञा आत्मविश्वासाने बोलते.

घरी भावंडात मोठी असलेली प्रज्ञा घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळते. रुपारेल कॉलेजच्या मागे असलेला दिव्यांग टेलिफोन बूथ ती चालवत असून त्याच्या माध्यमातूनही ती घराला हातभार लावते. विरारपासून माटुंग्याला रोजचा प्रवास करणे अवघड असले तरी परावलंबी व्हायचे नाही या एकाच विचारानेच ती रोज घर सोडते.

मतिमंदांचा 'आवाज' मनापासून ऐका

सकाळ
११ मार्च २०१३
पुणे , भारत.

"मतिमंद आणि बहुविकलांगांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांचा "आवाज' समाजाने मनापासून ऐकण्याची आवश्‍यकता आहे. त्यांना न्याय मिळावा, त्यांचे हक्क त्यांना मिळावेत, यासाठी प्रशासकीय पातळीवरही योग्य प्रयत्न व्हायला हवेत," अशी अपेक्षा दिल्लीतील दिव्यांग कल्याण विभागाचे मुख्य आयुक्त प्रसन्नकुमार पिंचा यांनी रविवारी येथे व्यक्त केली. स्वत: अंध असल्याने कोणत्या समस्या आपल्यासमोर येतात, याची मला जाणीव आहे, असेही ते म्हणाले.

प्रौढ मतिमंदांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि "सावली'च्या वतीने आयोजित कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी पिंचा यांनी रसिकांशी संवाद साधला आणि ब्रेल लिपीत लिहिलेले अनेक मुद्देही वाचून दाखविले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते निरंजन पंड्या, "दिव्यांग कल्याण'चे आयुक्त बाजीराव जाधव, "एनएचएफडीसी'चे व्यवस्थापक ए. के. डे, समाजकल्याण विभागाचे आयुक्त आर. के. गायकवाड, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे, "सावली'चे अध्यक्ष वसंत ठकार उपस्थित होते.

मतिमंदांचा 'आवाज' मनापासून ऐका

बहुविकलांग व्यक्तींना मदत मिळत नाही, उपकरणे मिळत नाहीत, कर्ज वेळेवर काढता येत नाही, यांसह त्यांच्या इतर अनेक समस्या आहेत. त्या जाणून घ्यायला हव्यात. त्यासाठी आपणाला त्यांच्यातलेच एक व्हायला हवे. त्यांच्या समस्या एका व्यासपीठावर आणून त्या प्रश्‍नांवर गांभीर्याने चर्चा करायला हवी, असे सांगून पिंचा म्हणाले, ""बहुविकलांग व्यक्तींना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे येतात. मनोभावे कामही करतात. पण, काही संस्था स्वत: मोठे कसे होऊ, याचाच विचार करतात. ही प्रवृत्ती कमी व्हायला हवी."

पंड्या म्हणाले, ""खेडोपाड्यातील बहुविकलांग व्यक्तींपर्यंत सरकारच्या योजना, आरोग्य सुविधा पोचायला हव्यात. याची सध्या कमतरता जाणवत आहे." जाधव म्हणाले, ""दिव्यांगांसाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक जागा रिक्त राहत आहेत म्हणून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत." विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

सवलती तळागाळापर्यंत जाव्यात

लोकमत
११ मार्च २०१३
बाजीराव जाधव, दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे

दिव्यांगाना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी पुण्यात मोबाईल व्हॅन सुरूकरण्याबाबत योजना आखण्यात येत आहे. सवलतींचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्वाचे बनावट दाखले तयार केले जात असून, ते रोखण्यासाठी संगणकाचा वापर केला जात आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या आरक्षणाची योग्य अंमलबजावणी होईल.

दिव्यांगांसाठी मिळणार्‍या सवलतींचा लाभ तळागाळातील मतिमंद, बहुविकलांग आणि दृष्टिहीनांसह सर्व प्रकारच्या दिव्यांगांपर्यंत समान पद्धतीने पोहोचविण्याची गरज आहे. यासाठी या वर्गांसाठी धोरणे ठरविताना व त्यांची अंमलबजावणी करताना दिव्यांगांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घ्यावे, असे मत केंद्रीय दिव्यांग कल्याण मुख्य आयुक्त प्रसन्नकुमार पिंचा यांनी येथे व्यक्त केले.

राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने पुण्यात राज्यस्तरीय दिव्यांग सक्षमीकरण परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे उद््घाटन पिंचा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दिव्यांग कल्याण आयुक्त बाजीराव जाधव, समाज कल्याण आयुक्त आर.के.गायकवाड, राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे उपव्यवस्थापकीय संचालक ए. के. डे, राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे उपस्थित होते.

पिंचा म्हणाले, वित्त विकास महामंडळातर्फे दिल्या जाणार्‍या कर्जाचा लाभ काही विशिष्ट गटातील दिव्यांगांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अशा गटांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी त्यांनी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. दिव्यांग आणि बहुविकलांग समाजासाठी धोरणे राबविताना त्या गटातील प्रतिनिधींनाही समावून घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्य माणसांपेक्षा त्यांच्या समस्या समजून घेणे त्यांनाच शक्य आहे. त्यामुळे धोरणे आखताना आणि राबविताना त्यांचा समावेश अत्यंत आवश्यक आहे.

यावेळी आर.के.गायकवाड, ए.के.डे यांची भाषणे झाली. सावली संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष वसंत ठकार यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.