दिव्यांगाचे स्वावलंबन हाच उद्देश -सुहास काळे

लोकसत्ता
१ मार्च २०११
नागपूर, भारत

उपजत वेगळ्या प्रकारचे सामर्थ लाभलेल्याअंध, अस्थिव्यंग, मुकबधिरांना अल्प व्याजदराने उद्योग-व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे व त्या माध्यमातून स्वावलंबी बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा उद्देश महामंडळाचा आहे, असे प्रतिपादन दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे यांनी केले.

राष्ट्रीय दृष्टीहिन संघाच्या विदर्भ विभागीय शाखा नागपूरचे १६ वे द्विवार्षिक अधिवेशन आंध्र असोसिएशनच्या अमृतभवनात आयोजित करण्यात आले. यावेळी सुहास काळे बोलत होते.

अध्यक्षस्थानी सखे-सोबती फाऊंडेशनचे दीपक धोटे होते. यावेळी दिलीप भिवापूरकर, अतुल सेनाड, दीपक थोटे, सुहास काळे, एम.वाय. गुरुव, मनीष थुल आणि रेवाराम टेंभूर्णीकर व्यासपीठावर होते.

दिव्यांगांना अनोखे सामर्थ असलेल्या व्यक्ती असे संबोधले जाते. इंग्रजीत त्यांना ‘डिफरन्टली एबल्ड’ असे म्हणतात. अशाप्रकारे उपजत वेगळ्या प्रकारचे अनोखे सामर्थ लाभलेल्यांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच सामर्थशाली भारताकरिता त्यांची मदत घेणे आवश्यक आहे, असेही सुहास काळे म्हणाले.

दृष्टीहिनांच्या सर्वागिण विकासाकरिता निधी उभारुन त्याचा उपयोग मेडीकल, शिक्षण व पुनर्वसन यांच्याकरिता करण्यात येईल. निधी संकलनासाठी सखे-सोबती फाऊंडेशन कटीबद्ध राहिल, असे सखे-सोबती फाऊंडेशनचे दिलीप धोटे यांनी सांगितले.

दोन दिवसीय अधिवेशात ‘२१ व्या शतकातील दृष्टीहिनांसमोरील रोजगार विषयक आव्हाने’ याविषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेच्या १५ व्या अधिवेशनाचे इतिवृत्त वाचण्यात आले आणि गेल्या २ वर्षांचा ताळेबंद मंजूर करण्यात आला. गेल्या दोन वर्ष संघटनेने केलेल्या कामाचा आढावा मनीष थूल यांनी मांडला. पुढील दोन वर्षांकरिता बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारी मंडळाची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी मनीष थुल यांची तर सरचिटणीसपदी रेवाराम टेंभूणीकर यांची निवड करण्यात आली. संघाचे उपाध्यक्ष म्हणून गजानन पोपलघट, दशरथ ढोले, विजय येटरे यांची निवड झाली. सचिव पदावर प्रकाश लाकडे, चंचल दुपारे, भोजराज नाईक यांची आणि कोषाध्यक्ष म्हणून बादल कापसे यांच्यासह ११ सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. राष्ट्रीय दृष्टीहिन संघाचे प्रदेश अध्यक्ष एम.वाय. गुरव यांनी प्रास्ताविक केले. आभार देवराव मेश्राम यांनी मानले.