सवलती तळागाळापर्यंत जाव्यात

लोकमत
११ मार्च २०१३
बाजीराव जाधव, दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे

दिव्यांगाना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी पुण्यात मोबाईल व्हॅन सुरूकरण्याबाबत योजना आखण्यात येत आहे. सवलतींचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्वाचे बनावट दाखले तयार केले जात असून, ते रोखण्यासाठी संगणकाचा वापर केला जात आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या आरक्षणाची योग्य अंमलबजावणी होईल.

दिव्यांगांसाठी मिळणार्‍या सवलतींचा लाभ तळागाळातील मतिमंद, बहुविकलांग आणि दृष्टिहीनांसह सर्व प्रकारच्या दिव्यांगांपर्यंत समान पद्धतीने पोहोचविण्याची गरज आहे. यासाठी या वर्गांसाठी धोरणे ठरविताना व त्यांची अंमलबजावणी करताना दिव्यांगांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घ्यावे, असे मत केंद्रीय दिव्यांग कल्याण मुख्य आयुक्त प्रसन्नकुमार पिंचा यांनी येथे व्यक्त केले.

राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने पुण्यात राज्यस्तरीय दिव्यांग सक्षमीकरण परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे उद््घाटन पिंचा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दिव्यांग कल्याण आयुक्त बाजीराव जाधव, समाज कल्याण आयुक्त आर.के.गायकवाड, राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे उपव्यवस्थापकीय संचालक ए. के. डे, राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे उपस्थित होते.

पिंचा म्हणाले, वित्त विकास महामंडळातर्फे दिल्या जाणार्‍या कर्जाचा लाभ काही विशिष्ट गटातील दिव्यांगांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अशा गटांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी त्यांनी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. दिव्यांग आणि बहुविकलांग समाजासाठी धोरणे राबविताना त्या गटातील प्रतिनिधींनाही समावून घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्य माणसांपेक्षा त्यांच्या समस्या समजून घेणे त्यांनाच शक्य आहे. त्यामुळे धोरणे आखताना आणि राबविताना त्यांचा समावेश अत्यंत आवश्यक आहे.

यावेळी आर.के.गायकवाड, ए.के.डे यांची भाषणे झाली. सावली संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष वसंत ठकार यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.